
इचलकरंजी : विनायक कलढोणे
जगात गाजा-वाजा, कचरा घ्या ताजा-ताजा! – अशी ‘अनोखी’ घोषवाक्यं आता इचलकरंजीच्या गल्ल्यागल्ल्यांत गुणगुणली जात आहेत. कारण शहरात कचरा साचतोय, आणि तो उचलायला मनपा प्रशासनाकडे वेळ नाही, की जबाबदारीची जाणीव! उच्चशिक्षित अधिकारी आणि पुरस्कारप्राप्त महानगरपालिका असतानाही लाल नगर आरोग्य केंद्राशेजारील कचरा ढिगारे मनपाच्या बेजबाबदार कारभारावर बोट ठेवत आहेत.
लहानग्यांनी मोठा सवाल केला आहे — “काका, शाळेत शिकवतात परिसर स्वच्छ ठेवा… पण इथे रोज दुर्गंधीचा अभ्यास करावा लागतो!”
अंतरभारती शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी प्रतिक्रिया दिली. शाळेत जाण्याच्या रस्त्यावरच नेहमी कचऱ्याचा खच, त्यातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास, आणि याबाबत मनपा कर्मचाऱ्यांची ठरलेली उदासीनता — हे चित्र खरोखर चिंतेचं आहे.
एका ज्येष्ठ महिलेची तक्रार तर अगदी ठसठसून सांगते — “साहेब, कचऱ्यावर टीका करू नका, आमच्या गटारांकडे पाहा… आठ आठ दिवसांतही कोणी येत नाही!”

स्वच्छ भारत मिशनचं भलंमोठं पोस्टर झळकावणाऱ्या शहरात प्रत्यक्षात गटारं आणि कचरा यांचा ‘सहजीवन’ बहरत चालल्याचं वास्तव आहे.
मनपाचे अधिकारी सांगतात की “हा कचरा नागरिकांनी टाकलेला नाही, तर आमच्याच सफाई कर्मचाऱ्यांनी गोळा करून येथेच टाकलेला आहे.” म्हणजे ‘स्वच्छता’ची जबाबदारी जणू फक्त घोषणांची राहिलेली आहे.
आता प्रश्न उभा राहतो — मनपा नेमकी दोष कुणाचा मानते? नागरिकांचा की आपल्या कर्मचाऱ्यांचा? शिक्षण देण्यासाठी शाळेत जावं लागतं, पण येथे परिस्थिती उलटी झाली — शाळकरी मुलांपासून शिकण्याची वेळ मनपावर आली आहे.
एकंदरीत, शहरातील समस्या ही केवळ कचर्यापुरती राहिलेली नाही, ती आता नागरिकांच्या संयमाचा कचरा साचवू लागली आहे.
कधी होणार ‘कचरा उठाव’ कायमचा? की अजून किती काळ नागरिकांचा आवाज ‘कचऱ्याखाली’ दडवला जाणार?
बातमीचा व्हिडीओ पहा