
इचलकरंजी : विनायक कलढोणे
महात्मा गांधी चौकातील गांधीजींचा पुतळा सध्या दुरुस्तीसाठी हटवण्यात आला आहे. परंतु या दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेच्या बांधकाम विभागाने पर्यावरणालाच हरताळ फासल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे. पुतळ्याच्या सभोवताली असलेली आकर्षक हिरवळ हटवून तिथे थेट काँक्रीटीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ पुतळ्याच्या दुरुस्तीत सीमित राहिलेला नसून, पर्यावरणाच्या मूलभूत तत्वांवर घाव घालणारा असल्याची नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
महिनाभरापासून पुतळ्याच्या दुरुस्तीच्या कामात संथगती पाहायला मिळत आहे. त्यातच हिरवळीच्या जागेवर बिनदिक्कतपणे काँक्रीट टाकल्याने, “महापालिकेचा पर्यावरणपूरक विकास केवळ कागदावरच आहे काय?” असा प्रश्न विचारला जात आहे.
एकीकडे वृक्षारोपण आणि हरित परिसर वाढवण्याचे कार्यक्रम राबवले जातात, तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणची अस्तित्वात असलेली हिरवळ नष्ट केली जाते – ही दुहेरी भूमिका पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड नाराजीचा विषय बनली आहे.
गांधी पुतळा ही केवळ एक शिल्पप्रतिमा नसून, ती एक ऐतिहासिक आणि भावनिक वास्तू आहे. त्या परिसराचे देखील सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता तिथले नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवणे अपेक्षित होते.
नागरिकांतून जोरदार मागणी होत आहे की, १५ ऑगस्टपूर्वी गांधी पुतळ्याची दुरुस्ती पूर्ण करून तो मूळ जागी बसवावा आणि हिरवळीच्या पुनर्बांधणीचा त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा महापालिकेविरोधात आंदोलनाचे सूरही उमटू शकतात.