
इचलकरंजी/प्रतिनिधी : शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येसह विविध मागण्यांसाठी ‘इचलकरंजी नागरिक मंच’ (इनाम)च्या वतीने आज महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
इनामच्या प्रतिनिधींनी सांगितले की, पूर्वीच्या आंदोलनानंतर महापालिकेने नसबंदी मोहिम वाढवण्याचे व कुत्र्यांसाठी कोंडवाडा उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आतापर्यंत केवळ ९८४ कुत्र्यांचीच नसबंदी झाली असून, उपद्रव वाढत असल्याने तातडीने कारवाई करावी, अन्यथा दुर्घटनेची जबाबदारी महापालिकेवर राहील, असा इशारा देण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची दुरवस्था तातडीने दूर करण्याची आणि गणेश मंडप उभारणीसाठी आकारले जाणारे खुदाई शुल्क या वर्षी माफ करण्याची मागणीही करण्यात आली. महासत्ता चौक-थोरात चौक-आंबेडकर पुतळा या ८० फूट रस्त्यावरील अतिक्रमण, बंद पडलेली वाहने, अनधिकृत फुटपाथ तसेच झाडांच्या फांद्या हटवून रस्ता मोकळा करण्याची विनंतीही करण्यात आली.
या वेळी इनामचे अभिजीत पटवा, अमित बियाणी, उमेश पाटील, नितीन ठिगळे, हरीश देवाडीगा, सचिन बाबर, राजू आरगे, राम आडकी, दीपक अग्रवाल, अमोल मोरे, जतीन पोतदार, महेंद्र जाधव, दीपक पंडित, राजू पारीक आदी उपस्थित होते.
महापालिका सहा आरोग्य अधिकारी मंगेश दुरुगकर, स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ, डॉ. नितीन भाट यांच्या उपस्थितीत उपायुक्त विद्या कदम यांनी स्वच्छता निरीक्षकांकडून कुत्र्यांची संख्या अहवाल मागवण्याचे, उपद्रवी कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्याचे, कोंडवाड्यासाठी जागा शोधण्याचे तसेच गणपती शुल्क व अतिक्रमण प्रकरणी आवश्यक कारवाईचे निर्देश दिले.