
इचलकरंजी : विनायक कलढोणे
महाराष्ट्राची मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वस्त्रनगरीत एकीकडे २४ तास यंत्रमागांचा खडखडाट सुरू असतो, तर दुसरीकडे शहराला आता गुंडांची नगरी अशीही ओळख मिळू लागली आहे. परिणामी प्रशासनाने सर्व खाद्यपदार्थ व इतर व्यावसायिकांना रात्री ११ वाजेपर्यंत दुकाने बंद करण्याचे बंधन घातले आहे.
मात्र आश्चर्य म्हणजे, रस्त्यावरील बड्या खाद्य विक्रेत्यांच्या गाड्यांना पोलिस प्रशासनाकडून व्हीआयपी सवलत दिली जात आहे. हे गाडे मध्यरात्रीनंतरही उघडे असतात. सर्वसामान्य विक्रेत्याला शिक्षा, पण “मर्जीतील” विक्रेत्यांना मोकळीक — हा सरळ सरळ दुजाभाव आहे.
नागरिकांनी ११ नंतर सुरू असलेल्या गाड्यांविषयी पोलिसांना फोन केल्यास “तुम्हालाच काय प्रॉब्लेम आहे?” असे उद्धट उत्तर मिळते. एवढेच नव्हे तर, काही प्रकरणात तक्रारदाराचा नंबर थेट त्या खाद्य विक्रेत्याला देऊन त्याच्याच धमक्या ऐकाव्या लागतात. यात शिवाजीनगर पोलीस ठाणे अग्रेसर असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने शहरात रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. लोकांना खाद्यपदार्थांची गरज असताना सर्वांनाच सवलत द्या, अन्यथा केवळ गिर्हाईक पोसणाऱ्या गाड्यांनाच मुभा का दिली जाते? असा संतप्त सवाल व्यापारी व नागरिक करत आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकारी केवळ दौरे करून “शोभेपुरते निरीक्षण” करणार की खरोखरच न्याय देणार? हा मोठा प्रश्न आहे. पोलीस विभागाने अनेक दुकाने बंद केली असताना, गुन्हेगारी वाढणाऱ्या चौकाचौकात राजरोसपणे सुरू असलेले खाऊचे गाडे पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय चालतात का? असा थेट सवाल नागरिकांतून होत आहे..