
अॅड. सचिन माने यांच्या युक्तिवादाला यश
कोल्हापूर – कोल्हापूर येथे नुकतेच सुरू झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) पहिल्याच दिवशी महत्त्वाचा निर्णय देण्यात आला. अॅड. सचिन यशवंतराव माने यांच्या युक्तिवादाला मान्यता देत न्यायालयाने जामिन अर्ज मंजूर केला. त्यामुळे न्यायप्रविष्ट पक्षकारांना जलद गतीने न्याय मिळण्याचा मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे १७ ऑगस्ट रोजी स्थापन झाले. दुसऱ्याच दिवशी कामकाज सुरू होताच इचलकरंजी येथील अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाशी संबंधित जामिन अर्जावर सुनावणी झाली. आरोपी शाहुल कांबळे याच्यावर ३७६ (२)(J), ३७६ (२)(N), ३५४(A) सह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होता आणि तो मे २०२३ पासून न्यायालयीन कोठडीत होता.
सुनावणीदरम्यान अॅड. सचिन माने आरोपी दोन वर्षांहून अधिक काळ कैदेत असून, पिडीतेचा आरोप पाच महिन्यांनी उशिरा नोंदवला गेला तसेच खटल्यात कोणतीही प्रगती झालेली नाही, असा ठोस युक्तिवाद मांडला. दुसरीकडे सरकारी पक्षाने आरोपीला जामिन मंजूर झाल्यास पिडीतेच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने बचाव पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपीस जामिन मंजूर केला. याकामी अॅड. सचिन माने यांना अॅड. केदार पाटील, अॅड. प्रतीक टारे यांचे सहकार्य लाभले.
या निर्णयामुळे कोल्हापुरात सर्किट बेंचच्या स्थापनेनंतर न्यायप्रक्रिया जलद गतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून वकिलांसह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.