
प्रतिनिधी : गजानन खोत
तारदाळ गावच्या मगदूम मळ्यात रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला. दोन घरांमध्ये घुसून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण बारा लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
तारदाळ गावाच्या पूर्व बाजूस असणाऱ्या मगदूम मळ्यात पहाटे दोनच्या सुमारास शितल राजाराम मगदूम यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घुसून तिजोरी फोडली. या तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने – अंगठी, पाटल्या, कर्णफुले, चेन असे अंदाजे ८ ते १० तोळे सोने आणि ७० हजार रुपयांची रोख रक्कम चोरांनी लंपास केली.याच वेळी शेजारी राहणाऱ्या प्रकाश मगदूम यांच्या घरात देखील चोरांनी प्रवेश केला. घरातील महिलेच्या गळ्यातील दीड ते दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख १० ते १५ हजार रुपये तसेच ३० हजार रुपये किमतीचा स्मार्टफोन चोरांनी पळवला. या दोनही घरातून एकूण अंदाजे बारा लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे समजते.
या घटनेनंतर मगदूम मळा परिसरात मोठी भीती पसरली आहे. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गेल्या महिनाभर परिसराची टेहळणी करून १० ते १५ चोरट्यांच्या टोळीने हा दरोडा घातला असावा, अशी चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे.