
आठवडी बाजार व म्हसोबा यात्रेसाठी गट नंबर ४६८ ची संपूर्ण जमीन कायम ठेवण्याची मागणी
शहापूर : रसूल जमादार
इचलकरंजी शहापूरमधील गट नंबर ४६८ या जागेवर परंपरेने आठवडी बाजार आणि म्हसोबा यात्रा भरत आली आहे. मात्र या जागेतील निम्म्यापेक्षा जास्त भागावर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) बांधण्याचा घाट घालण्यात येत असल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामस्थांनी याबाबत खासदार धैर्यशील माने यांना निवेदन देत ही जागा पूर्णपणे आठवडी बाजार आणि यात्रेसाठीच राखून ठेवण्याची मागणी केली.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, उर्वरित जागेमध्ये आधीच मेघराजा मंदिर, विनायक हायस्कूल, कुस्ती मैदान आणि चाळीस फूट रस्ता यासाठी जागा दिलेली आहे. त्यामुळे भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या प्रचंड गर्दीचा विचार करता आठवडी बाजारासाठी आणि यात्रेसाठी असलेली सध्याची संपूर्ण जमीनच अपुरी पडते. अशा परिस्थितीत आरटीओ कार्यालय उभारले तर ग्रामस्थांच्या परंपरेला व संस्कृतीला धोका निर्माण होईल.
या पार्श्वभूमीवर खासदार माने यांच्यासमोर ग्रामस्थांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. ग्रामस्थांच्या भावना ऐकून घेत खासदार धैर्यशील माने यांनी या प्रश्नावर सुवर्णमध्य काढून ग्रामस्थांच्या लढ्याला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना आठवडी बाजार बचाव कृती समितीचे उदयसिंग पाटील, रतन वाझे, प्रधान माळी, दिलीप पाटील, सचिन राणे व संतोष काळगे उपस्थित होते.