
कोल्हापूर | नवरात्रीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी देवी-आई अंबाबाईसमोर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा, या मागणीसाठी साकडे घालण्यात आले. या अभियानाचा प्रारंभ मंदिरातून करण्यात आला असून, जिल्ह्यातील १ लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित करून त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहेत.
हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी सांगितले की, ‘‘लव्ह जिहाद हा केवळ वैयक्तिक गुन्हा नसून एक संघटित व वैचारिक युद्ध आहे. यात खोटी ओळख, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, मानवतस्करी, हत्या आणि दहशतवादी कारवायांपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो. त्यामुळे महाराष्ट्रात तात्काळ कठोर कायदा लागू होणे गरजेचे आहे.’’
गरबा-दांडिया यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचा गैरवापर करून धर्मांध युवक खोटी हिंदु नावे सांगून युवतींना प्रेमजाळ्यात अडकवतात, असा आरोप या वेळी करण्यात आला. उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही कायदा व्हावा, यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे.
या वेळी शिवसेना, हिंदू एकता आंदोलन, सेवाव्रत प्रतिष्ठान, महाराष्ट्र मंदिर महासंघ, महाराजा प्रतिष्ठान, हिंदू महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
