
इचलकरंजी | स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने इचलकरंजीतील स्टेशन रोडवरील स्वागत कमानीनजीक असलेल्या संदेश परमिट रुम अॅन्ड बिअर बारमधील चोरी उघडीस आणली आहे. या प्रकरणी उमेश गोसावी याला अटक करण्यात आली आहे. तर अभिजीत घाडगे व मुकेश गोसावी हे दोघे फरारी आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, 10 फेबु्रवारी रोजी पंचगंगा साखर कारखाना परिसरातील कमानीनजीक असलेल्या संदेश परमिट रूम अॅन्ड बियर बारमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास बारचा खिडकीचे गज कापून चोरट्यांनी गल्यात ठेवलेली 46 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर चोरीचा संपूर्ण प्रकार बारमधील सीसीटीव्हीत कैद झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सुचनेवरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाकडे सोपविला होता.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात असताना शिवाजीनगर पोलीस ठाणे समोरील गोसावी गल्लीतील उमेश गोसावी याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने या चोरीची कबुली दिली. तर त्याचे साथीदार अभिजीत घाडगे, मुकेश गोसावी हे दोघे फरारी आहेत. त्या दोघांचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन मसुगटे, जालिंदर जाधव, महेश पाटील, महेश खोत, संजय कुंभार, खंडेराव कोळी, हिंदुराव केसरे, प्रशांत कांबळे, प्रदीप पाटील, नवनाथ कदम, विजय इंगळे, रोहित मर्दाने, प्रविण पाटील, कृष्णात पिंगळे, अमित सर्जे, विशाल खराडे, संजय पडवळ, अनिल जाधव, सुशिल पाटील, यशवंत कुंभार आदींच्या पथकाने केली.