
इचलकरंजी : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन- मराठी दिन महोत्सवाच्या निमित्ताने येथे आयोजित करण्यात आलेल्या एकांकिका उत्सवातील लॉटरी आणि अलमोस्ट डेड या दोन वेगळ्या शैलीतील पण आशयपूर्ण अशा दोन एकांकिकांच्या सादरीकरणाने उपक्रमाची सांगता करण्यात आली.येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा यांच्या वतीने हा उपक्रम संपन्न झाला.
पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, अभिजीत होगाडे तसेच निखिल शिंदे व किर्ती सुतार आणि संयोजक पदाधिकारी यांच्या हस्ते नटराज प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सतीश पाटील यांनी स्वागत तर समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संतोष आबाळे यांनी केले.

फोर्थ वॉल थिएटर इचलकरंजी या संघाने प्रथम आपली ’लॉटरी’ ही एकांकिका उत्तमरित्या सादर केली. मोलमजुरी करणारे एक अतिशय गरीब नवरा बायको, त्यांच्या शेजारी उत्तरकार्याची कामे करणारा गरीब वृद्ध गृहस्थ व त्यांचा छोटा नातू यांची ही भावस्पर्शी गोष्ट होती. त्यांच्यात छोटी मोठी भांडणे असली तरी शेवटी संकटात दोन्ही कुटुंबे एकत्र येतात, तो प्रवास या कथेत दाखवण्यात आला. लेखन व दिग्द्धर्शन निखिल शिंदे यांचे होते तर आविष्कार कांबळे, मानसी कुलकर्णी, सक्षम कदम, वैष्णवी संकापगोळ, सिद्धार्थ संकापगोळ व निखिल शिंदे इत्यादी कलाकारांनी यामधील भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडल्या.
’अलमोस्टू डेड’ ही गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर या संघाने प्रभावीपणे सादर केली. कॉर्पोरेट क्षेत्रात परदेशात काम करणारा युवा उद्योजक आणि त्याचे भारतात असणारे आई वडील यांच्या दुरस्थ नात्यांची ही कथा होती. अति कामात गुरफटलेला हा मुलगा वडिलांच्या निधनाच्या दुःखद प्रसंगी सुद्धा कसा असंवेदनशीलपणे वागतो, एक प्रकारे मृतवत बनतो त्याची ही गोष्ट रसिकांना कटू वास्तवाची जाणीव करून देणारी होती. लेखन व दिग्द्दर्शन प्रमोद पुजारी यांचे होते. अनुपम दाभाडे आणि योगेश हवालदार या दोन प्रमुख कलावंतांनी उत्तम प्रकारे भूमिका पार पाडल्या. दोन्ही एकांकिकांनी आपल्या परिणामकारक सादरीकरणामुळे रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविला.