इचलकरंजी | येथील जयहिंद मंडळाचे संस्थापक, संघटक व आंतरराष्ट्रीय खेळाडू स्व. मल्हारपंत बावचकर (मामा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयहिंद मंडळाच्या वतीने शुक्रवार 7 ते रविवार 9 मार्च या कालावधीत पुरुष व महिला गटातील कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जयहिंद मंडळाचे क्रिडागणांवर ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेतून ठाणे येथे आयोजित राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार्या संघांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती जयहिंद मंडळाचे अध्यक्ष सतिश डाळ्या यांनी दिली.
या स्पर्धा कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होत असून सायंकाळच्या सत्रात मातीच्या चार क्रिडांगणावर घेतली जाणार आहे. सदर स्पर्धेतील सामने सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत खेळले जातील. स्पर्धेसाठी भव्य व आकर्षक स्टेजची मांडणी करण्यात आली असून 5 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी बैठक गॅलरीची व्यवस्था केली आहे. या स्पर्धेत पुरुष व महिला यांना चषक प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक दिले जाणार आहेत. स्पर्धेसाठी 30 संघ पुरुष व 8 संघ महिला सहभागी होणार आहेत.बर्याच वर्षानंतर इचलकरंजीकरांना कबड्डीचा थरार पाहण्यास व अनुभवास मिळणार आहे. स्पर्धेमध्ये प्रो कबड्डीत चमकलेले मंडळाचे खेळाडू आदित्य पोवार, सौरभ फगरे, कोल्हापूर जिल्ह्यातून ओंकार पाटील, दादासो पुजारी, साहिल पाटील याबरोबरच शिवाजी विद्यापीठ खेळाडूंचे कौशल्य पाहण्यास मिळणार आहे.सदर स्पर्धावेळी सायंकाळाच्या सत्रात सहभागी संघातील खेळाडू, व्यवस्थापक, प्रशिक्षक सामनाधिकारी, पदाधिकारी यांना मोफत भोजन व्यवस्था जयहिंद मंडळाच्या वतीने केली आहे. स्पर्धेची जय्यत तयारी सुरु असून काम अंतिम टप्प्यात आले आहे.
या स्पर्धेचा क्रीडा रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शशांक बावचकर, मंडळाचे कार्याध्यक्ष उदय चव्हाण, सेक्रेटरी दिलीप ढोकळे यांनी मंडळाच्या वतीने केले आहे. यावेळी शशिकांत पाटील, राजेंद्र चौगुले, शंकर पोवार, प्रविण फाटक, सुनिल सुतके, रुपेश जाधव, बाबासाहेब कोतवाल, सदाशिव कित्तुरे, सतिश मेठे, पोपट सातपुते, सुहास गोरे, अतिम कागले, मनोहर वडीगे, देवेंद्र बिरनाळे, अमर भिसे, तुषार जगताप, नंदु भोरे, संतोष बाबर, जहांगीर मुजावर उपस्थित होते.
