
- विनायक कलढोणे
इचलकरंजी : इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले मात्र नागरिकांचे प्रश्न जैसे थे असून ठेकेदार, काही वर्चस्ववादी बोके “लोण्यावर” ताव मारताना दिसत आहे. यातील एक प्रकरण म्हणजे शासकीय निधी व कामांचा बट्याबोळ.
इचलकरंजी हे शहर कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते. या शहरावर राजकीय वर्चस्व असावं अशी इच्छा प्रत्येक पक्षाची आहे. त्यामुळेच सर्वच पक्षाकडून यासाठी प्रयत्न केले जातात. या शहराची लोकसंख्याही मोठी आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर हा मुद्दा होता, सर्वांच्या निवडणूक जाहीरनाम्यातही या मुद्द्याचा समावेश होता. आणि आता महानगरपालिकेची निर्मिती झाल्यावर प्रत्येक जण महापालिकेचा बिन बुलाया मेहमान बनून मलिदावर डोळा ठेवून अधिकांऱ्याशी हातमिळवणी करून इचलकरंजीच्या अनेक विकास कामांना खो घालत असल्याचे दिसून येत आहे.
महानगरपालिकेचे स्वप्न की दिवास्वप्न?
ज्या धामधुमीत 2022 ला राज्य शासनाच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली व विकासाची स्वप्नं इचलकरंजीकरांना दाखविण्यात आली ती दिवास्वप्न होती याची प्रचिती महापालिकेच्या कारभाराचा अनुभव घेताना येथील नागरिकांना येत आहे. महापालिकेची घोषणा आणि शहराच्या विकासाची स्वप्नं दाखविण्यात आली होती. परंतु, या स्वप्नांच्या प्रत्यक्ष रूपात फारसा विकास झालेला नाही. महापालिकेच्या कारभाराचा अनुभव घेत असताना नागरिकांना एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, त्यांची आशा फोल ठरली आहे. शासकीय निधी मिळूनही अपेक्षित कामे सुरू होण्याऐवजी ती अडचणींत अडकली आहेत, आणि ठेकेदार, अधिकारी तसेच गावगुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींच्या संगनमताने शहराचा विकास हताश झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे आणि ते “औषध नको, पण वैद्य आवरा” अशी भावना व्यक्त करत आहेत.
विकासकामांवर राजकीय गालबोट
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी महानगरपालिकेला शंभर कोटी रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र तत्कालीन पालकमंत्र्यांनी केवळ 51 कोटीवर महापालिकेच्या तोंडाला पाणी पुसले. आणि महापालिकेचा मेवा घटला. निधी आला तसे झटपट निविदा मंजूर झाल्या कामांना गती येणार असे वाटत असताना मात्र गावातील काही दादा असलेल्या पुढाऱ्यांनी निधीत डल्ला मारण्याच्या हेतूने मक्तेदार, अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुरळीत सुरू असणारी कामे बंद पाडली.
अधिकार, मक्तेदार आणि स्वयंघोषित गुंड प्रवृत्तीचे गावपुढारी यांनी मिलीभगत करून परस्पर हिस्सा ठरवला. शासन निधीचा मलिदा मिळाल्याशिवाय कामांना सुरवात करायची नाही अशी प्रेमळ धमकी दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे सध्या इचलकरंजीत सुरू असणारी रस्ते व गटारींचे कामे अर्ध्यावर लटकली आहेत. यामुळे महापालिकेला नुकसान होतचं आहे तसे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. खुदाई केलेल्या रस्त्यांवर वाहतूक करणे, ये-जा करणे मुश्किल झाले आहे. गावगुंड प्रवृत्तीचे हे बोके स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवून घेत मिरवत गावच्या कामांवर स्वतः च्या ताटात तूप वाढून घेण्याचा पराक्रम करत आहेत.
प्रशासकराज असले तरी अधिकारी माजी लोकप्रतिनिधीमुळे काम थांबल्याचे दबक्या आवाजात सांगतात. तर मक्तेदार गावगुंडाचा त्रास असल्याचे सांगतो पण त्याच्याच पंगतीत बसून तो निविदा भरतो यामगचे गौडबंगाल काय? आहे हे न कळण्याएवढी जनता दूधखुळी नाही.
अधिकारी आणि ठेकेदार हतबल
याविषयी महापालिकेत विचारणा केले असता सध्या प्रशासकराज असले तरी अधिकारी माजी लोकप्रतिनिधीमुळे काम थांबल्याचे दबक्या आवाजात सांगतात. तर मक्तेदार गावगुंडाचा त्रास असल्याचे सांगतो पण त्याच्याच पंगतीत बसून तो निविदा भरतो यामगचे गौडबंगाल काय? आहे हे न कळण्याएवढी जनता दूधखुळी नाही. पण आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो असाच कारभार सध्या सुरू आहे. त्यामुळे जनतेची कामे खोळंबली आहेत हे मात्र नक्की. दरम्यान मर्जीतील कामे होत नसल्याने आयुक्त बदलण्याच्या हालचाली वर्षभर झाल्या. आता आयुक्त बदलल्यानंतर तर जनतेची कामे प्रामाणिकपणे होणार का?, या गावपुढाऱ्यांना लगाम लागणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
ReplyForwardAdd reaction |