
इचलकरंजी | रुकडी (ता. हातकणंगले) येथील कापड व्यावसायिक धनाजी राजाराम खुडे (वय 34) यांना जीवे मारण्याची धमकी देत दरमहा 5 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी जर्मनी टोळीतील आनंदा शेखर जाधव उर्फ जर्मनी (वय 26 रा. हनुमाननगर जवाहरनगर) आणि अक्षय अशोक कोंडुगळे (वय 25 रा. मराठा चौक जवाहरनगर) या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने सातारा कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. दोघांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, दोन महिन्यांपूर्वी प्रविण मगदूम याने कबनूर येथून फिर्यादी धनाजी खुडे याला आनंदा जर्मनीने बोलविल्याचे सांगत शंभुराजे कॉर्नर येथील एका टॅटुच्या दुकानात नेले. त्याठिकाणी आनंदा जर्मनी याने खुडे याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्याला खुडे याने नकार दिल्याने त्याला जबरदस्तीने त्याच्याच चारचाकी (क्र. एमएच 09 जीएम 6040) वाहनातून आनंदा व प्रविण यांनी सोन्या मारुती चौक येथे नेत असताना खुडे याच्याकडील 78 हजाराचे दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. सोन्या मारुती चौक येथे आल्यानंतर अक्षय कोंडुगळे याने त्याच्याकडे 5 लाखाची मागणी केली. त्यावेळी खुडे याने नकार दिल्याने कोंडुगळे व अनोळखी व्यक्तीने त्यास शिवीगाळ करत कानशिलात लगावली. तर आनंदा जर्मनी याने चाकू काढ, याला कर्नाटकात नेऊन भोसकुन टाकुया, उचलून आणल्याचे कोणी पाहिले नाही, त्यामुळे काही विषय नाही असे सांगितले. त्यावर कोंडुगळे हा चाकू काढत असतानाच खुडे याना प्रसंगावधान राखत गाडीचा दरवाजा उघडत व चावी घेऊन पलायन केले. संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण खुडे बचावला. या प्रकरणी खुडे याने दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी प्रविण मगदूम याला अटक डिसेंबरमध्येच अटक करण्यात आली आहे. तर अन्य तिघांचा शोध सुरु होता.
यापैकी आनंदा जाधव व अक्षय कोंडुगळे या दोघांना सातार शहर पोलिसांनी एका प्रकरणात अटक केली असून ते 27 फेब्रुवारीपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोघांची शिवाजीनगर पोलिसांना आवश्यकता असल्याने त्यांचा ताबा मिळणेबाबत येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचेकडे विनंती केली होती. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सातारा कोर्टाला पत्र देऊन सातारा कारागृहातून दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. आनंदा जर्मनी याच्यावर सातारा, इचलकरंजीतील शिवाजीनगर, शहापूर पोलिस ठाण्यात विविध गंभीर स्वरुपाचे 16 गुन्हे दाखल आहेत. तर अक्षय कोंडुगळे याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत.