
इचलकरंजी | दारातील लाईट सुरु ठेवल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीवर कुर्हाड आणि चाकूने केलेल्या हल्ल्यात पत्नी जखमी झाली. या प्रकरणी सौ. शांता गजानन शेटके (वय 45 रा. शास्त्री सोसायटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती गजानन आप्पासो शेटके (वय 53) याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जवाहरनगरातील शास्त्री सोसायटीत शेटके दाम्पत्य राहण्यास आहेत. 2 मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास झोपेतून जागे झालेल्या पती गजानन शेटके यांनी दारातील लाईट का सुरु ठेवलीस असे म्हणत शिवीगाळ करत कुर्हाड हातात घेतली. ते पाहून शांता यांनी हातातील कुर्हाड काढून घेत ती पलंगाखाली सारली.
त्यावेळी गजानन ढकलून दिल्याने खाली पडलेल्या शांता यांच्या उजव्या डोळ्याला खुर्ची लागली. त्याचवेळी गजानन यांनी स्वयंपाक घरातील चाकू घेऊन शांता यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर वार केला. हल्ल्यानंतर शांता या घराबाहेर जात असतानाच गजानन यांनी कुर्हाड घेऊन त्याच्या लाकडी दांड्याने डोक्यात मारले. यामध्ये शांता या जखमी झाल्या असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गजानन यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. गजानन शेटके यांस न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.