
इचलकरंजी : 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने 10 ते 12 मार्च या कालावधीत महानगरपालिका सभागृह तसेच श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
10 मार्च रोजी महिला अधिकारी कर्मचार्यांसाठी सकाळी 11 ते 1 यावेळेत महानगरपालिका सभागृहात आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. 11 मार्च रोजी सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत सकाळी 10 वाजता रांगोळी स्पर्धा, सकाळी 11 वाजता महिला व मुलींसाठी नृत्य स्पर्धा, दुपारी 4 वाजता महिलांसाठी स्वच्छ शहर होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात येणार आहे. 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मेहंदी स्पर्धा, सकाळी 11 वाजता वक्तृत्व स्पर्धा, दुपारी 12 वाजता महिला व मुलीसाठी ग्रुप नृत्य स्पर्धा असे कार्यक्रम होणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ व ‘जागर स्त्री शक्तीचा’ हा सुमित डान्स अॅकॅडमी प्रस्तुत कार्यक्रम होईल. स्पर्धेबाबतची सर्व माहिती महानगरपालिका महिला व बाल विकास विभागाकडे तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सोशल मिडिया अकौंटवर पाहण्यास मिळेल. कार्यक्रम आणि स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महिला/मुलींनी नाव नोंदणीसाठी महिला व बाल विकास विभागांकडे संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.