
इचलकरंजी | ज्या विभागाकडून शहराची स्वच्छता व नागरिकांचे आरोग्य जोपासले जाते महानगरपालिकेतील त्याच आरोग्य विभागातील कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे कोणत्या कारणासाठी किती दर याचा तक्ताच दर्शविण्यात आला आहे. या संदर्भात सफाई कर्मचार्यांनी थेट आयुक्तांकडे तक्रार केली असून आयुक्त यावर कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
इचलकरंजी शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी महानगरपालिकेत स्वतंत्र आरोग्य विभाग असतो. या विभागातील सफाई कर्मचार्यांकडून दररोज साफसफाई, स्वच्छता व इतर तत्सम कामे केली जातात. त्यातूनच शहरवासियांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते. परंतु या आरोग्य विभागातीलच कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक अधिकारी व पदाधिकार्यांकडून सुरु असल्याबद्दलचा मोठा गौप्यस्फोट तक्रार अर्जांमुळे झाला आहे. शहरात 1 ते 25 वॉर्ड असून याठिकाणी कायम नेमणूकीचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना शासन नियमांनुसार हक्काची रजा, मेडीकल रजा, किरकोळ पगारी रजा शिवाय पर्यायी रजा आदींचा लाभ दिला जातो. परंतु या हक्काच्या लाभासाठी या कर्मचार्यांना आर्थिक आणि मानसिक अशा अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आजवर या संदर्भात कोणीही तक्रार करण्याचे धाडस केले नव्हते. तर कोणी धाडस केलेच तर त्याला आणखीन मानसिक त्रास दिला जातो.
अर्जित रजा आणि मेडीकल रजा यासाठी आरोग्य विभागाचा संबंध येतो. या विभागाच्या मंजूरीसाठी मुकादम, स्वच्छता निरिक्षक, मुख्य स्वच्छता निरिक्षक यांची शिफारस घ्यावी लागते. त्यानंतर आरोग्य अधिकारी मंजूरी देतात. त्यातच या विभागात कार्यरत कमी शिक्षित असलेल्या काही कर्मचार्यांना पगार पत्रकांसह अन्य कार्यालयीन कामे सोपविण्यात आलेली आहेत. हे कर्मचारी रजेच्या नियमांची, वरिष्ठ अधिकार्यांची भीती दाखवून पैसे उकळतात असाही आरोप या तक्रार अर्जात केला आहे.
मेडीकल रजा (10 ते 20 दिवस) यासाठी 3 हजार रुपये, अर्जित रजा (10 ते 20 दिवस) यासाठी 2 हजार रुपये, खाडी रजा (1 ते 2 महिने) 5 हजार रुपये आणि किरकोळ पगारी रजा यासाठी 500 रुपये असा दर निश्चित करण्यात आल्याचे तक्रार अर्जात नमुद केले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या रजेचा अधिकार असतानाही कर्मचार्यांकडे सातत्याने पैशांची मागणी केली जाते. आधीच आर्थिक खाईत लोटला गेलेला हा सफाई कर्मचारी गरजेपोटी अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे घेऊन अधिकार्यांच्या गरजा पूर्ण करतात, त्याशिवाय रजा मंजूर होत नाही.
आरोग्य विभागातील मनमानी कारभाराचे सूत्रधार हे आरोग्य अधिकारी हेच असून ते स्वत:ला वाटेल तेच निर्णय घेतात. पण नोकरीच्या भीतीपोटी सफाई कामगार आजपर्यंत पुढे येत नव्हते. परंतु आता मागणीचे आकडे वाढत चालले असून आवाज उठविणार्या कर्मचार्याचे मुकादम, स्वच्छता निरिक्षक, मुख्य स्वच्छता निरिक्षक यांचे दबाव तंत्र वापरुन मानसिक व आर्थिक खच्चीकरण केले जाते. त्यामुळे आम्हांला न्याय मिळवून द्यावा, त्याचबरोबर संबंधित कर्मचार्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या सफाई कर्मचार्यांनी आयुक्तांकडे केली आहे.