
इचलकरंजी : पत्नी दुसरा विवाह करत असल्याचे समजल्याने करंबळ (ता. अकलुज) येथील पतीने इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाणे आवारात अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेखर अर्जुन गायकवाड (वय 31) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली. त्याचा जीव वाचवण्यासाठी सुरु असलेली धावपळ आणि भयभीत झालेल्या पोलिसांसह नागरिकांचे त्याला वाचवण्यासाठी धडपड सुरु होती. जखमी शेखर याला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेते प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सोलापूर जिल्ह्यातील करंबळ (ता. अकलुज) येथील शेखर गायकवाड याची इचलकरंजी सासरवाडी आहे. तो पत्नीला त्रास देत असल्याने त्याची पत्नी सध्या माहेरीच राहत होती. दोघांमध्ये नोटरी पध्दतीने सोडचिठ्ठी झाली आहे. त्यामुळे पत्नीचा नातेवाईकांकडून दुसरा विवाह करून दिला जात असल्याची माहिती शेखरला मिळाली. त्यामुळे तो आज इचलकरंजीत येऊन तिचा दुसरा विवाह करण्यास विरोध करत होता. त्यातूनच त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर शेखरने थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत पोलिसांसमोर आपली कैफीयत मांडली.
पोलिसांनी धीर धरण्याचा सल्ला दिला. परंतु ऐकण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या शेखरने अचानक पोलीस ठाणे आवारातच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. त्यानंतर जीवाच्या आकांताने तो सैरभैर पळु लागला. वाचवा, वाचवा म्हणत त्यानं पोलीस ठाण्यातही प्रवेश केला. तसेच पेटलेल्या स्थिती पोलीस गाडीत शिरण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी काहींनी स्वत:चे कपडे काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस ठाण्यासमोरील घरातून चादर आणून त्याच्या अंगावर टाकली. त्यामुळे आग आटोक्यात आली. त्याला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेत तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु जास्त प्रमाणात भाजल्याने शेखरला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. परंतु, पत्नी किंवा सासरवडीतील नातेवाईकांना आणा, त्याशिवाय उपचारच घेणार नाही असा हट्ट सुरु केला होता. पण पोलिसांनी त्याची समजूत काढत सीपीआर रुग्णालयाकडे नेले.