
इचलकरंजी | इचलकरंजी शहरासाठी मंजूर सुळकुड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी करत इचलकरंजी नागरिक मंच तर्फे आयुक्तपल्लवी पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात योजनेबाबत झालेल्या संपुर्ण घडामोडींचा आढावा घेत सुळकुड हीच योजना योग्य असल्याचे ठासून सांगण्यात आले. तांत्रिक समितीच्या बैठकीत आपण सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीसाठी आग्रही रहावे व म्हणणे ठामपणे मांडावे, असे निवेदनाद्वारे सुचवण्यात आले.
सुळकूड योजना 2020 मध्ये मंजूर झाली. नोव्हेंबर 2022 मध्ये अमृत-2 मध्ये समावेश होऊन त्यासाठी 160 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र नदीकाठच्या काही गावांच्या विरोधामुळे योजनेत अडथळा निर्माण झाला आहे. 21 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शासनस्तरावर तक्रारींचा सविस्तर अहवाल पाठवण्यात आला असून त्यामध्ये सर्व गैरसमज व राजकीय विरोधाचे मुद्दे खोडून काढले आहेत. आमदार राहुल आवाडे आणि खासदार धैर्यशील माने यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत दोघांनीही सुळकुड योजनेसाठी ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली. साठवण क्षमतेसाठी मार्ग निघू शकतो, वेळेला पूर्वव्यवहारता अहवाल देणारे आता नवनवीन मुद्दे का उपस्थित करत आहेत हाही मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला.
यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनीदेखील सुळकुड योजनेबाबत आग्रही भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी अमित बियाणी, राम आडकी, महेंद्र जाधव, जतीन पोतदार, सुषमा साळुंखे, राजेश बांगड, दीपक पंडित, रामचंद्र निमणकर, अभिजित पटवा आदी सदस्य उपस्थित होते.