
इचलकरंजी : केंद्र सरकारने वाढवलेले घरगुती गॅस दर तसेच पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर मागे घ्यावा या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सिलेंडरसह मोर्चा काढण्यात आला. ही दरवाढ त्वरीत मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
नुकतीच केंद्र सरकारने घरगुती गॅस दरात पन्नास रुपयांची वाढ त्याचबरोबर पेट्रोल व डिझेल दरातील अबकारी करात प्रति लिटर 2 रुपयाची वाढ लागू करण्याचे जाहीर केले आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे देशातील जनता हवालदिल झाली आहे. अशातच या वाढीव दरामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. वस्तुतः आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणावर घसरलेले व कमी झालेले असताना आपल्या देशात कर वाढ करणे सर्वसामान्य जनतेच्या हिताविरोधी आहे. ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी करत इचलकरंजी शह काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन ही दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर, बाबासो कोतवाल, युवराज शिंगाडे, किशोर जोशी, तौसिफ लाटकर, बिसमिल्ला गैबान, वैदिका कळंत्रे, रवि वासुदेव, रमजान शिकलगार, योगेश कांबळे, अनिल पच्छिंद्रे, चंद्रकांत मेस्त्री, आण्णा कांबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.