
इचलकरंजी : इचलकरंजी शहर आणि परिसरात रामभक्त हनुमान जन्मोत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्मोत्सवाचे औचित्य साधत संपूर्ण सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर शनिवारी सकाळपासूनच जन्मकाळ आणि पवनपुत्र बजरंगबलीच्या दर्शनासाठी सर्वच मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर शहरातील सर्व तालीममध्येही हनुमानाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. दरम्यान, सायंकाळी वानरसेना यांच्या वतीने शोभायात्रेचेही आयोजन करण्यात आले होते.
पवनपुत्र हनुमान जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात आणि धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. यानिमित्ताने संपूर्ण सप्ताहभर हनुमान चालीसा, रामायण पठण, प्रवचन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे सहा वाजता सर्वच ठिकाणी जन्मकाळ साजरा करण्यात आला. त्यानंतर सुंठवडा वाटप करण्यात आला. शहरातील शिवेचा मारुती, काळा मारुती, महासत्ता चौक, गावभाग महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, गुजरी पेठ, राजवाडा चौक, श्रीपादनगर, सोनपाऊली मंदिर खंजिरे मळा, महात्मा गांधी पुतळा, सम्राट अशोकनगर, विक्रमनगर, इंदिरानगर, आवाडेनगर, आयोध्यानगर वड मारुती, सांगली नाका, शहापूर आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अनेक मंदिरांसह विविध मंडळांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाही लाभ असंख्य भक्तांनी घेतला.
श्री शिवतीर्थ येथून वानरसेना यांच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. सर्वात पुढे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा, आकर्षक विद्युत रोषणाई आणि बजरंगबलीचा भव्य असा पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.