
इचलकरंजी : विनायक कलढोणे
गेल्या काही वर्षांपासून इचलकरंजीसह आसपासच्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह सीमा भागातील विद्यार्थी व पालक “तांब्याच्या महालात” शिक्षण मिळेल, स्वप्नपूर्ती होईल, अशी ‘श्रद्धा’ बाळगून आप्पांच्या अकॅडमीत दाखल झाले. परंतु या भक्कम आशेच्या पायाखालची जमीन विद्यार्थ्यांसाठी नरकयातना ठरू लागली. आणि शेवटी एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याने ही तथाकथित शिक्षणसंस्था चव्हाट्यावर आली.
‘गुरुवर्य’ की गृहित धरलेला गृहितक?
श्रद्धेचा मुखवटा घालून विद्यार्थ्यांना भय, अपमान, अपार ताण, आणि मानसिक छळाच्या गर्तेत ढकलणारे व्यवस्थापन “आप्पा” म्हणून ओळखले जात होते. ‘आप्पा’ म्हणजे मार्गदर्शक, आधारवड – पण येथे तो शब्द विद्यार्थ्यांसाठी दहशतीचे दुसरे नाव ठरला.
मृत्यूने दिलेला आवाज
श्रद्धा अकॅडमीमधील आत्महत्या झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी थेट व्यवस्थापनाला दोषी धरले आहे. “आमच्या मुलाचा आत्मविश्वास संपला नव्हता, संपवलं गेला,” असे शब्द थेट व्यवस्थापनावर बोट ठेवतात. त्यांच्या मते ही फक्त शैक्षणिक अपयशाची बाब नाही, ही मानसिक त्रासाची आणि व्यवस्थेच्या पिळवणुकीची झळ आहे.
कायद्याचे आव्हान आणि यंत्रणेची परीक्षा
अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. युवासेनेने देखील व्यवस्थापन व संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पालकांची ‘श्रद्धा’ हरवली, शिक्षण बळी पडले
पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घेतलेला ‘श्रद्धेचा तांब्या’ आता अपुऱ्या पाण्याने भरलेला आहे. आत्महत्या, नैराश्य, आणि विस्कळीत झालेले विद्यार्थी हे त्या श्रद्धेतील अंधत्वाचे परिणाम आहेत.
शेवटी एक प्रश्न — शिक्षण म्हणजे घडवणं की झाकणं?
शिक्षण संस्था म्हणजे विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा शोध घेणारे व्यासपीठ असते, त्यांना दबावाखाली मोडून टाकणारी लष्करी छावणी नव्हे. श्रद्धा, संस्कार, आणि शिस्त या नावाखाली जर पिळवणूक होत असेल, तर ही अंधश्रद्धाच नव्हे का?
तांब्याच्या महालात लपलेली अंधश्रद्धेची ही प्रणाली उघड झाली आहे. आता वेळ आहे – शिक्षणात ‘आप्पा’ चा मनमानी कारभार नाही, तर मनमोकळा ‘अभ्यास’ हवा!
फोटो – गुगल साभार