
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित त्रैभाषिक कवी संमेलनाने शहरात शब्द, भावना आणि हास्याच्या तरंगांचे अद्वितीय मेघमालय तयार केले. मराठी, हिंदी व उर्दू या तीनही भाषांतील प्रथितयश कवींच्या सादरीकरणांनी रसिकांची मने जिंकली.
येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरलेले होते. तर मंचावर मान्यवरांचे तेज आणि कवितांच्या ओळींनी संपूर्ण वातावरण भारून गेले होते. कवी संमेलनाचे उद्घटन महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त तथा कवयित्री सौ. सुषमा शिंदे-कोल्हे होत्या. सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी इरफान पटेल यांनी केले.
संमेलनाची सुरुवात व्याकुळ गोयंका यांच्या दमदार हिंदी रचनेने झाली. त्यानंतर प्रा. रोहित शिंगे यांनी शायरी सादर करत कविता म्हणजे अनुभवांची ठिणगी असते हे दाखवून दिले. मुजावर मालेगाव यांनी एम.ए. बी.ए. तूही मै हु जंगली बबुल कैसे तेरा बाप मुझे करेगा कबूल या शेरांमधून हास्याची खळखळ उडवली. कपिल शर्मा यांनी साळी-साली च्या विनोदी कवितांनी ‘दैनंदिन जीवनात हास्य शोधता येतं’ हे दाखवून दिलं. विद्या पोळ यांनी आपल्या सशक्त मुक्तछंद कवितांनी व्यासपीठ भारले. उर्दू शायरीचं सौंदर्य उलगडताना महेशर आफ्रिदी यांनी जमी पर घर बनाया है मगर जन्नत में रहते ही हमारी खुश नासीबी ही की हम भारत में रहते है म्हणत उर्दूची मोहकता दाखवली. सोलापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी देखील आपल्या खास शैलीत उर्दूच्या नजाकतीने रसिकांची वाहवा मिळवली. सौ. सुषमा शिंदे-कोल्हे यांनी दमदार कविता सादरीकरण केले.
त्यानंतर किशोर कदम यांचा सलग एक तास रसिकांशी संवाद कार्यक्रम झाला. त्यांनी शब्दांच्या लाटांवर श्रोत्यांना अलगद तरंगवले. यावेळी उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, मुख्य लेखाधिकारी विकास खोलपे, सौ. आरती पाटील, माजी नगरसेवक, पत्रकार आणि इचलकरंजीकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन सहा. आयुक्त विजय राजापुरे यांनी केले.