
इचलकरंजी | विनायक कलढोणे इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता असून, या लढतीत शिवसेना (शिंदे गट) निर्णायक भूमिकेत दिसणार असल्याची मोठी चर्चा जनतेत आतापासूनच होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने हे या निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवत महापालिकेवर भगवा फडकावण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी माने गटाकडून भक्कम मोर्चेबांधणी होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकीचे न्यायालयातर्फे बिगूल वाजताच इचलकरंजीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. नेते, कार्यकर्ते व इच्छूक उमेदवारांनी धडपड सुरू केली आहे. अशात रवींद्र माने यांची तयारी जोरदार असल्याचे दिसून येते कारण त्यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र युतीच्या राजकारणात त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. आणि भाजपाचा नवा आमदार मतदारसंघाला मिळाला. रवींद्र माने यांची राजकीय कुशलता यावेळी अधोरेखित झाली. परंतु आता दिल्ली नंतर गल्लीची निवडणूक भाजप स्वबळावर लढवण्याच्या तयारीत असल्याने माने आता नवा डाव रंगविणार अशी चर्चा आहे. इचलकरंजी महापालिका निवडणुकीत गाफील न राहता आतापासूनच पुर्ण ताकदीनिशी तयारी सुरू केली आहे.
कोल्हापूर महापालिकेतील नुकतेच माजी महापौरांसह 29 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. त्याच धर्तीवर इचलकरंजीतील माजी उपनगराध्यक्ष व 22 माजी नगरसेवक माने यांच्या संपर्कात आहेत. त्यापैकी बहुतेकांनी शिवसेनेच्या अधिकृत ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. सध्या माने यांच्या गटात 12 माजी नगरसेवक सक्रिय आहेत.
इचलकरंजी महापालिकेची 65 जागांवर निवडणूक होणार असून, मागील नगरपालिकेच्या सभागृहातील संपर्कात असणारे पक्षीय बलाबल असे आहे: भाजप – 24, महाविकास आघाडी – 20, (शिवसेना शिंदे गट – 9, राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 6, आकस्मिक निधन – 3, स्वीकृत सदस्य – 5 (महाविकास 3, राष्ट्रवादी 1, शिवसेना 1)
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. भाजपमध्ये हाळवणकर व आवाडे हे प्रमुख गट एकत्र आले असले तरी त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. महाविकास आघाडीतही जागावाटप, उमेदवारी आदी मुद्द्यांवर संभ्रम आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) कमी जागांवर लढून प्रत्येक जागा जिंकण्याची रणनीती आखत असून, गरज भासल्यास शिवसेनेशी युतीसुद्धा शक्य असल्याची शक्यता आहे.
रवींद्र माने यांची काही वर्षातील राजकीय सक्रियता व चाणाक्ष मित्रत्वाचे राजकारण पहाता अनेकांना शिवसेना शिंदे गट हा निवडणुकीस सुरक्षित गट वाटत आहे. मोठ्या पक्षातील बेबनाव व गटातटाच्या वर्चस्ववादात पडण्यापेक्षा स्वतंत्र असा शिवसेना शिंदे गट व पक्ष चिन्हाला इच्छुकांची पसंती असल्याचीही चर्चा होत आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने हे पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या थेट संपर्कात असून, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांना संधी देण्याचे आश्वासन मिळाले होते. त्यामुळे यंदा स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देत शिवसेना स्वतंत्र ताकद म्हणून उभा राहत आहे. कोल्हापूरप्रमाणे इचलकरंजीतही मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार असून, आगामी महापालिका निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगतदार होण्याची शक्यता आहे. या लढतीत शिवसेना (शिंदे गट) निर्णायक ‘किंगमेकर’ ठरू शकतो.