
इचलकरंजी/प्रतिनिधी – जागतिक अमलीपदार्थ विरोधी जनजागृती दिनानिमित्त शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

दत्ताजीराव कदम ए.एस.सी. कॉलेज, इचलकरंजी येथे झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. शंकर खाडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते डॉ. संदेश पाटील (मानसोपचार तज्ज्ञ) व सौ. भाग्यश्री देवमोरे (आरोग्य सल्लागार) यांनी व्यसनाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम तसेच व्यसनमुक्तीसाठी उपाय सांगितले. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सायबर गुन्हेगारी, सोशल मिडियाचा योग्य वापर व पालकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. २०० ते २५० विद्यार्थी उपस्थित होते.

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जीजस हायस्कूल, इचलकरंजी येथे प्रभातफेरी काढण्यात आली. “व्यसनाचा पाया मोडा, आयुष्य सुखाशी जोडा” अशा घोषवाक्यांनी परिसर दणाणला. प्रभातफेरीत १०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पोलीस अधिकारी सहभागी झाले.

न्यू इंग्लिश स्कूल, चंदूर येथे शालेय विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. आंबेडकर नगर, कबनूर येथे किशोरवयीन मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.