

इचलकरंजी | येथील वेदपाठ शाळेच्या प्रांगणात भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी मोहिमेत सहभागी असणारे नायब सुभेदार प्रवीण विश्वास पाटील यांचा इचलकरंजी वेदपाठ शाळेच्या वतीने मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी समरभुमीवर आलेले अनुभव कथन केले.
मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकक करत पाहुण्यांची ओळख वेदपाठ शाळेचे सेक्रेटरी दिग्विजय कुलकर्णी यांनी करुन दिली. श्री योगेश्वरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनिष आपटे यांनी मानपत्राचे वाचन केले. वेदमूर्ती प्रभाकर भाटवडेकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न कार्यक्रमास चित्पावन संघाचे अध्यक्ष उल्हास लेले यांनी, सीमेवर डोळ्यात तेल घालुन मातृभूमीच्या रक्षणार्थ अहोरात्र लढणारे व जागृत राहणारे सैनिक व वेदमंत्रांची पवित्रता संस्कृतीचे जतन करणारे ब्रह्मवृंन्द म्हणजे छात्रतेज व ब्रह्मतेज यांचा संगम वेदभवनच्या प्रांगणात झाल्याचे गौरोवोद्गार काढले. वेदपाठशाळा अध्यक्ष वेदमुर्ती मनोज निगुडकर यांचे हस्ते मान्यवरांसह सुभेदार प्रवीण पाटील यांचा तसेच सौभाग्यवती सुवर्णा प्रविण पाटील यांचा सत्कार सौ. मनाली निगुडकर, सौ.दिपाली कुलकर्णी व सौ. पल्लवी बडवे यांनी केला.
यावेळी सुभेदार प्रविण पाटील यांनी मोहिमेचे अनुभव सांगताना शत्रुच्या प्रदेशापासुन पन्नास फुट अंतरावर रात्रीच्या भयाण अंधारात एका बाजुला शत्रुची नजर चुकवायची तर दुसर्या बाजुला ब्लँक टायगरपासुन स्वतःचे संरक्षणार्थ बंदुक देखील चालवायची नाही अशा अवस्थेत सैनिक रात्रंदिवस लढत असतात. तीन-तीन दिवस एकाच जागी बसुन लक्ष गाठायचे कसब अंगी बाळगताना मिळेल ते खाऊन त्या परिस्थितीत मनोधैर्य ढळु न देता मातृभूमीच्या रक्षणार्थ लढणार्या सैनिकांचे केलेले हे वास्तववादी वर्णन अनुभव कथन ऐकुन उपस्थितांचे डोळे पाणावले.
यावेळी वेदपाठ शाळा माजी उपाध्यक्ष मोरेश्वर कुलकर्णीं, ब्राह्मण प्रिमियर लीगचे मार्गदर्शक अॅड. सारंग जोशी, उपाध्यक्ष वेदमूर्ती संदिप कुलकर्णी, वेदपाठ शाळेचे विश्वस्त वेदमूर्ती सुरज बडवे, भगवान कुलकर्णीं, संतोष कुलकर्णी, ब्राह्मण सभा सेक्रेटरी संजय मैंदर्गी, बीबीएन इचलकरंजीचे पदाधिकारी वल्लभ भाटवडेकर, संजय पुजारी, प्रसाद लेले तसेच ब्राह्मण सभेचे संचालक उपस्थित होते. मनिष आपटे यांनी आभार व्यक्त केले.