इचलकरंजी / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य कोष्टी समाज सेवा मंडळाच्या वतीने राज्यातील हातमाग व वस्त्रोद्योग व्यवसायातील उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या वस्त्रोद्योग पुरस्काराची घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी केली आहे. त्यामध्ये गजानन विष्णुपंत होगाडे, गोपालराव रमेश तारळेकर, सौ. ममता संजयराव खोजे, श्रीमती वनमाला लक्ष्मण भागवत, सौ. सुशिला गणपतराव भरते यांचा समावेश आहे.
गेली पाच वर्षे महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाच्या वतीने राज्यातील हातमाग व वस्त्रोद्योग व्यवसायातील उद्योजकांना वस्त्रोद्योग पुरस्कार देवून सन्मानीत केले जात आहे. यावर्षीच्या सन २०२५ च्या वस्त्रोद्योग पुरस्कारासाठी इचलकरंजीतील लिनन कापडाचे उत्पादक उद्योजक गजाननराव होगाडे. विट्याचे ऑटोलूम कारखानदार गोपालराव तारळेकर, येवला परिसरातील हातमागावरील पैठणीच्या उत्पादक उद्योजिका सौ. ममता खोजे, श्रीमती वनमाला भागवत सौ. सुशिला भरते यांना जाहीर करण्यात आला आहे. तर संस्थात्मक पुरस्कारासाठी विदर्भातील अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील श्री जगदंब विणकर शिक्षण संस्था यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रथमच दिला जाणारा कोष्टी समाज भगिरथ पुरस्कार महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा येवल्याचे माजी नगराध्यक्ष स्व. अॅड. माधवराव रूपचंद्र नागडेकर यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार ७ ऑगस्ट रोजी आसरा लॉन्स कोपरगांव रोड, येवला (जि. नाशिक) येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, संयोजन समितीचे अध्यक्ष मनोजराव दिवटे, महिला अध्यक्षा सौ. सुषमा दौडे. युवा अध्यक्ष राजेश सपाटे यांनी दिली.