
भौतिक सुधारणा कामांना गती येणार : संजय केंगार यांचा विशेष पुढाकार
इचलकरंजी /प्रतिनिधी :
येथील आसरानगर परिसरातील श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे विद्यामंदिर क्र. ३९ या प्रशालेस महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील आणि अतिरिक्त आयुक्त सौ. सुषमा शिंदे-कोल्हे यांनी अचानक भेट दिली. या भेटीत शाळेतील विविध उपक्रम, गरजा व परिसराचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी प्रशालेच्या वतीने आयुक्तांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक गणेश साळुंखे यांनी प्रशालेच्या वतीने सुरू असलेल्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती दिली. ‘माझी शाळा-माझा विद्यार्थी या अभिनव उपक्रमाची तसेच शिक्षकांच्या वर्गणीतून पट वाढीसाठी होणाऱ्या प्रयत्नांची विशेष दखल आयुक्तांनी घेतली. यावेळी नुतनीकरण करण्यात आलेल्या शाळा कार्यालयाचे उद्घाटन आयुक्त पाटील यांच्या हस्ते फीत कापून झाले. त्यानंतर वर्ग खोल्यातील गळती, लाईट फिटिंग, स्वच्छतागृह दुरुस्ती, कंपाउंड दुरुस्ती, रंगरंगोटी अशा विविध भौतिक गरजांची पाहणी करून संबंधित कामे लवकरच सुरू केली जातील, असे त्यांनी सांगितले.
या दौऱ्याची पायाभरणी माजी आरोग्य समिती सभापती संजय केंगार यांच्या प्रयत्नातून झाली. त्यांनी आयुक्त पाटील यांच्याशी संवाद साधून हा दौरा घडवून आणला. या परिसरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कष्टकरी वर्ण मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षणाची गरज असली तरी भौतिक सुविधांच्या अभावामुळे विद्याथ्याँची संख्या घटत आहे. असे कंगार यांनी सांगत शाळेच्या गरजांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या या प्रयत्नामुळेच आयुक्तांनी शाळेच्या गरजा समजून घेत सुधारणा कामांना गती देण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या नवीन आदेशानुसार शाळेच्या पट वाढीसाठी परिसरातील अंगणवाड्यांचे वर्ग शाळेच्या वर्ग खोल्यांमध्येच घेण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम दास, महापालिका विविध विभागांचे अभियंते, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.