
इचलकरंजी / प्रतिनिधी :
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने तथाकथित ‘हिंदू आतंकवाद’ किंवा ‘भगवा दहशतवाद’ या संकल्पनेमागचे राजकीय षड्यंत्र अखेर उघड झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी तीव्र शब्दांत म्हटले आहे की, “हा केवळ काही व्यक्तींवर झालेला अन्याय नाही, तर संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचा एक विखारी कट होता. आता या खोट्या षड्यंत्रामागे असलेल्या सूत्रधारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”
श्री. शिंदे म्हणाले, “हिंदू असल्यामुळे राष्ट्रनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहित, मेजर उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि अजय राहिरकर यांच्यासारख्या व्यक्तींना अकारण वर्षानुवर्षे तुरुंगात डांबण्यात आले. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळाची कल्पना न केलेली बरी. हे सगळं एक राजकीय षड्यंत्र होतं.”
त्यांनी यावेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. “सुशीलकुमार शिंदे यांनी ‘हिंदू आतंकवाद’ असा शब्द वापरल्याची चूक नंतर मान्य केली, पण त्यांनी तो शब्द कुणाच्या सांगण्यावरून वापरला, याचा खुलासा अजून झालेला नाही. राहुल गांधी यांनी अमेरिकन राजदूतासमोर हिंदू दहशतवाद पाकिस्तानातील इस्लामी आतंकवादापेक्षा मोठी समस्या असल्याचे विधान केले, हे विकिलिक्सने उघड केले होते. हे सर्व मुद्दे गंभीर असून, त्याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” अशी ठाम मागणी श्री. शिंदे यांनी केली.
“हिंदूंना आतंकवादी ठरवणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास हा अन्याय अधिक गडद होईल,” असेही ते म्हणाले.
(नोट : सदर निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत प्रतिनिधीकडून प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार आहे.)