
शिरोळ, जि. कोल्हापूर
शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात पाळीव प्राण्याप्रमाणे वाढलेल्या आणि ग्रामस्थांच्या जीवनाचा भाग झालेल्या ‘महादेवी’ हत्तीला गुजरात येथील प्राणी संगोपन केंद्रात हलविण्यात आल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई केली असली तरी हत्तीच्या भावनिक आणि सामाजिक नात्याची जाणीव न ठेवता तातडीने केलेल्या हालचालींवर टीका होत आहे.
या घटनेवर हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार भूमिका मांडली असून, महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, “महादेवी ही हत्ती नसून गावकऱ्यांची एक सजीव ओळख होती. ती माणसांत रुळली होती. तिचा सांभाळ घरगुती प्राण्याप्रमाणे केला जात होता. त्यामुळे तिच्या बाबतीत विशेष बाब म्हणून निर्णय घेणे गरजेचे होते.”
खासदार माने यांनी प्रशासनाची भूमिका समजून घेतली असली तरी, यामध्ये गावकऱ्यांच्या भावना, जीवसृष्टीचा स्नेह आणि स्थानिक समजूतदारपणाचा विचार न झाल्याचे नमूद केले आहे. त्यांनी ही बाब लोकसभेत मांडून केंद्र सरकारकडे महादेवीला नांदणी येथे परत आणण्यासाठी विशेष सवलत किंवा नियमातील लवचिकता वापरण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
काय म्हणाले खासदार धैर्यशील माने खालील व्हिडिओमध्ये पहा
दरम्यान, नांदणी परिसरात हत्तीच्या अचानक जाण्यामुळे नागरिक हळहळ व्यक्त करत असून, सोशल मीडियावरही ‘महादेवीला परत आणा’ अशी मोहिम सुरू झाली आहे. हत्तीला प्रेमाने लाडाने वाढवले गेले होते. विशेष म्हणजे हत्ती व स्थानिक जनतेत एक मानवी स्नेहबंध निर्माण झाला होता.
महादेवीचा प्रश्न केवळ वन्य प्राणी कायद्याचा नसून, तो लोकभावनेशी जोडलेला आहे, अशी भावना आता जिल्ह्यात रूजत चालली आहे.