
प्रतिनिधी – रसूल जमादार
शहापूर गट नंबर 468 मधील जागेवर आरटीओ कार्यालय उभारणीच्या प्रस्तावाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध कायम आहे. या वादग्रस्त प्रकरणावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार होती. मात्र मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सोमवारी पुढे ढकलण्यात आली असून शहापूर सह इचलकरंजीकरांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
काल ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गट नंबर 468 वरील मोजणीला विरोध दर्शवत ती थांबवली. यात्रेकरिता व आठवडी बाजाराकरिता ही जागा कायमस्वरूपी राखून ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आमदार राहुल आवाडे यांनी देखील आरटीओ कार्यालय येथे होणार नसल्याचे आश्वासन दिल्याचे नागरिकांनी बैठकीत स्मरण करून दिले. काल झालेल्या तणावानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व पक्षांना घेऊन चर्चा होणार होती. परंतु ती बैठक पुढे ढकलली गेल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत शासन काय निर्णय घेते याकडे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांचे बारकाईने लक्ष लागले आहे.