
इचलकरंजी/प्रतिनिधी –
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबई येथे सुरु केलेल्या आर या पार लढाईला पाठींबा दर्शवत इचलकरंजी शहर आणि परिसरातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने येथील शिवतीर्थ परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली.
दरम्यान, आंदोलनास पाठींबा दर्शवत हातकणंगले तालुक्यातून मराठा समाज बांधवांनी शक्य तितक्या मोठ्या संख्येने मुंबईकडे मार्गस्थ व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. मराठा समाजाचे नेते जरांगे-पाटील यांनी मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मागणीसाठी आर या पार ची लढाई सुरु केली आहे. या लढ्याला हातकणंगले तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. इचलकरंजीतही शुक्रवारी सकाळी सकल मराठा समाजबांधव एकत्र आले व त्यांनी शिवतीर्थ परिसर घोषणांनी दणाणून सोडला. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, करेंग-जितेंगे, हम सब जरांगे अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. सुमारे अर्धातास सुरु असलेल्या या आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. आंदोलनस्थळी शिवाजीनगर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनात सकल मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.