
इचलकरंजी/प्रतिनिधी –
स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असलेल्या इचलकरंजी फेस्टिव्हलमध्ये यंदाची नव्या रंगात व नव्या ढंगात स्पर्धा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यंदाचा इचलकरंजी फेस्टिव्हल 3 ते 5 सप्टेंबर या कालावधीत श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह हे भरविण्यात येणार असल्याची माहिती फेस्टिव्हलच्या संयोजिका सौ. मोश्मी आवाडे यांनी दिली.
गणेशोत्सव आणि इचलकरंजी फेस्टिव्हल हे मागील 29 वर्षांपासून एक समीकरणच बनून गेले आहे. पुणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी फेस्टिव्हलची सुरुवात करुन स्थानिक कलाकारांना एक चांगले व्यासपीठ मिळून दिले आहे. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी उत्तुंग भरारी घेत इचलकरंजी शहराच्या नांवलौकिकात भर घातली आहे. यंदाचा फेस्टिव्हलही असाच धमाल उडवून देणारा असणार आहे.
श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे फेस्टिव्हलचा शुभारंभ आमदर राहुल आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्रीं च्या महाआरतीने होईल. त्यानंतर अन्नपूर्णा पाककला स्पर्धा होणार आहे. यामध्ये केक डेकोरेशन आणि राईस (भात) चे विविध प्रकार तयार करावयाचे आहेत. या स्पर्धेसाठी मोफत प्रवेश असून राईस डेकोरेशनसाठी 5000/-, 4000/- व 3000 आणि 1000/- ची दोन उत्तेजनार्थ त्याचबरोबर केक डेकोरेशनसाठी 3000/-, 2000/- व 1000/- अशी बक्षिसे असणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्यांनी नजमा शेख (9850967186), शितल सुर्यवंशी (7887330301) व सपना भिसे (9850638431) यांच्याशी संपर्क साधावा.
3 सप्टेंबर रोजीच दुपारी 2 वाजता फेस्टिव्हलचे आकर्षण बनलेल्या इचलकरंजी फेस्टिव्हल श्री 2025 शरीरसौष्ठव स्पर्धा होईल. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोशिएशन व न्यू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोशिएशन यांच्या मान्यतेने होणारी ही स्पर्धा एकूण 5 गटात होणार असून प्रत्येक गटातील विजेत्यास आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणार्या स्पर्धकांनी शेखर शहा (9850166688), अजिंक्य रेडेकर (8421318421) व दिपक माने (7503571111) यांच्याशी संपर्क साधावा.
गुरुवार 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जोडी तुझी माझी हा विविध गुणदर्शन स्पर्धा कार्यक्रम होईल. यामध्ये कोणतीही जोडी चालू शकेल. विजेत्यांना 5000/-, 4000/-, 3000/- आणि उत्तेजनार्थ 1000/- अशी बक्षिसे देण्यात येतील. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणार्यांनी अर्चना कुडचे (975186618), सीमा कमते (8380897379), गिरीजा हेरवाडे (9699326133) व मेघा भाटले (9673003334) यांच्याशी संपर्क साधावा. याचदिवशी सायंकाळी 6 वाजता गोल्डन मेलोडीज द ग्रँड म्युझिकल नाईट हा हिंदी, मराठी गीतांचा सुरेल असा गाण्यांचा कार्यक्रम होईल.
शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता शालेय व महाविद्यालयीन डान्स कॉम्पिटिशन होईल. यामध्ये इयत्ता 5 ते 7 वी, 8 वी ते 10 वी आणि खुला गट 11 वी ते पदवीधर असे तीन गट असतील. पहिल्या दोन गटासाठी 5000/-, 4000/- व 3000/- तर खुल्या गटासाठी 7000/-, 6000/- व 5000/- अशी बक्षिसे देण्यात येतील.
याशिवाय इचलकरंजी मर्यादीत घरगुती गणेशोत्सव आरास (डेकोरेशन) आणि हातकणंगले तालुका मर्यादीत गौरी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही स्पर्धांसाठी 1 सप्टेंबर ही अंतिम तारीख असून 45 सेकंदांचा व्हिडीओ बनवून तो 7620373642 या क्रमांकावर पाठविण्यात यावा. व्हिडीओ हा नैसर्गिक चित्रीकरण केलेला असावा. दोन्ही गटातील विजेत्यांना 5000/-, 3000/- व 2000/- अशी बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेचा निकाल व बक्षिस समारंभ शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता ना.बा.घोरपडे नाट्यगृहात होईल, असे सौ. मोश्मी आवाडे यांनी सांगितले.
या सर्व कार्यक्रमांचा शहर व परिसरातील नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन शेखर शहा, अहमद मुजावर यांनी केले आहे.