
तारदाळ | नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांनी भाविकांसाठी कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे.
तारदाळ येथील श्री शिरकाई देवी हे जागृत देवस्थान असून प्रतिवर्षी पाचव्या माळेला देवीची पालखी श्री शिरकाई कोडी मंदिरात नेली जाते. या पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक, विशेषतः वृद्ध, महिला व लहान मुले सहभागी होतात. मंदिराचे अंतर मोठे असल्याने पायी प्रवास करताना अनेकांना त्रास सहन करावा लागतो.
हीच अडचण लक्षात घेऊन विनोद कोराणे यांनी भाविकांसाठी मोफत रिक्षा सेवा सुरू केली. गावातून कोडी मंदिरापर्यंत दर्शनासाठी ये-जा करण्याची ही मोफत सोय सकाळपासून सुरू राहिली. या उपक्रमामुळे हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला.
गावकऱ्यांनी व भाविकांनी या कार्याचे कौतुक करताना समाधान व्यक्त केले. “सामाजिक जबाबदारी केवळ बोलून चालत नाही, ती कृतीतून साकारावी लागते, हे विनोद कोराणे यांनी दाखवून दिले,” अशा शब्दांत महिलांनी भावना व्यक्त केल्या.
या उपक्रमामुळे नवरात्र उत्सव अधिक सोयीस्कर व आनंददायी ठरला असून भाविकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले आहे.
