

इचलकरंजी | गावभाग पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात जुगार, गावठी दारू विक्री, बेकायदेशीर दारू, गांजा विक्री, आणि मटका स्थानिक गोपनीय व गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वरदहस्ताखाली जोमाने सुरू आहे. त्यामुळे सहा महिन्यात दोन पोलीस निरीक्षक बदलले अशी चर्चा जोमाने सुरू आहे. परिणामी, या भागातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली असून, महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा या गैरप्रकारांविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रार करणाऱ्या कुटुंबांना गुंड प्रवृत्तीचे लोक धमकावत असल्याच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारांसमोर पोलिसांचा काहीएक वचक राहिलेला नाही. तक्रारींवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांकडून केवळ औपचारिक चौकशी केली जाते, मात्र ठोस कारवाई होताना दिसत नाही.
या परिस्थितीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जावीत अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. “पोलिसांनी जर गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी ठोस कारवाई केली नाही, तर कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पोलिस प्रशासनाने त्वरित कठोर कारवाई करावी, अन्यथा मोठ्या जनआंदोलनाची शक्यता वर्तविण्यात येत आहे!
– विनायक कलढोणे