
इचलकरंजी | प्रशासकीय कामातील शिस्तबध्दता कायम ठेवण्याबरोबरच शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली साफसफाई स्वच्छता आणि पिण्याचे पाणी यावर आपले प्राधान्य असणार आहे. सध्या शहरात जी जी विकासकामे सुरु आहेत त्याची माहिती घेऊन ती वेळेत व चांगल्या पध्दतीची करुन घेण्यासाठी आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली झाल्यानंतर आयुक्तपदी पल्लवी पाटील यांची नियुक्ती होऊन त्या रुजू झाल्या आहेत. शहरातील विविध समस्या, अडचणी, सुरु असलेली विकासकामे, प्रशासकीय कामकाज पध्दती या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आयुक्त पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या, आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर आपण प्रथमत: आरोग्य विभागाशी संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन स्वच्छता विषयक कामकाजाची माहिती जाणून घेतली. शहरातील दैनंदिन कचरा उठाव आणि साफसफाई वेळच्या वेळी करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत. शहराला सध्या पंचगंगा आणि कृष्णा या दोन योजनांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु दोन्ही ठिकाणी जुनी यंत्रणा कार्यान्वित असल्याने तेथून पुरेशा प्रमाणात पाणी उपसा करताना अडचणी येतात. त्यामुळे या योजना सक्षम करण्यावर आपला भर असून कृष्णा योजनेच्या 1800 मीटरच्या जलवाहिनी बदलण्याचे काम येत्या 15 दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित मक्तेदाराला दिल्या आहेत.
शहरासाठी अमृत 2.0 अंतर्गत राज्य शासनाने सुळकूड योजना मंजूर केली आहे. परंतु काही अडचणी व विरोधामुळे ही योजना थांबली आहे. या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी शासनाने सविस्तर अहवाल पाठविला आहे. त्यावर शासन जो निर्णय देईल त्याची अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासन करेल असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर शहरातील अतिक्रमण, प्राथमिक शाळांच्या इमारतींची दूरवस्था, ओपन स्पेस, फुटपाथ आदी समस्यांबाबत सुरु असलेल्या कामाची माहिती घेऊन ते चांगल्या पध्दतीने पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु, असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.