
इचलकरंजी | येथील महापालिकेच्या सभागृहातील अंतर्गत सजावटीचे आणि मोठे तळे सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. या कामांची आयुक्त पल्लवी पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्तापुर्ण आणि मुदतीत काम पूर्ण करण्याच्या सुचना केल्या.
आयुक्त पाटील यांनी सभागृह अंतर्गत सजावटीच्या कामाची पाहणी करताना गुणवत्तापुर्वक आणि मुदतीत काम पूर्ण करण्याबरोबरच या मजल्यावरील बैठक व्यवस्थेसाठीचा आराखडा तयार करण्याच्या सुचना शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, अभियंता बाजी कांबळे आणि मक्तेदार प्रतिनिधींना दिल्या.
अमृत योजनेतून महापालिकेच्यावतीने मोठे तळे सुशोभीकरणाचे काम सुरु होऊन बराच कालावधी झाल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त पाटील यांनी या कामातील अडचणीबाबत विचारणा केली. तसेच हे काम शहराचा लौकिक आणि सौंदर्य वाढवणारे असल्याने शहर अभियंता क्षिरसागर आणि संबंधित मक्तेदारास सुशोभीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच या कामाच्या अनुषंगाने काही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधण्याची सुचनाही दिली.