
इचलकरंजी | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा शुक्रवार 21 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. इचलकरंजी व परिसरात एकूण 16 केंद्र असून त्यामध्ये 9 हजार 617 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या सर्व केंद्रांवर गोविंदराव हायस्कूल आणि डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल या दोन कस्टडीतून संपूर्ण नियंत्रण ठेवले जाणार असल्याची माहिती कस्टडी प्रमुख एन. जे. पाटील व अजय बिरणगे यांनी दिली.
इचलकरंजी केंद्र अंतर्गत गोविंदराव हायस्कुल, डॉ. बापूजी साळुंखे हायस्कुल, व्यंकटराव हायस्कुल, आंतरभारती विद्यालय, छत्रपती राजर्षि शाहू हायस्कुल, शहापूर हायस्कुल, कबनूर हायस्कुल, व्यंकटेश्वरा इंग्लिश हायस्कुल, हुपरी इंग्लिश स्कुल, न्यु इंग्लिश स्कुल लाट, न्यू इंग्लिश स्कुल रेंदाळ, एम. जी. शहा विद्यालय बाहुबली, श्री रामराव इंगवले हायस्कुल हातकणंगले, दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कुल पट्टणकोडोली, सन्मती विद्यालय तारदाळ, महात्मा गांधी विद्यालय रुकडी अशी 16 केंद्र आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 ते 17 मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. उत्तरपत्रिकेची गोपनीयता राहण्यासाठी सहायक परीरक्षक बैठे पथक म्हणून परीक्षा केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच प्रश्नपत्रिकांची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येईल. सहायक परीरक्षक यांनी त्यांच्या मोबाइलचे जीपीएस सुरू ठेवणे आवश्यक आहे.
परिक्षे दरम्यान परिक्षा केंद्राबाहेरील दीडशे मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. विद्यार्थ्यांना साडेदहालाच परिक्षा केंद्रात यावे लागणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसह परीक्षेतील गैरप्रकारांना लगाम घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच महसूल,पोलिस, शिक्षणाधिकारी, यांचीही विशेष पथके असणार आहेत. परीक्षा तणाव आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी परीक्षा केंद्रांवर योग्य ते नियोजन केले आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थीसंख्येत 38 ची भर पडली असल्याने दहावी परीक्षेसाठी तगडे नियोजन असणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रप्रमुखांची बैठक झाली असून त्यांना आवश्यक बारकोड, स्टिकर, अत्यावश्यक उत्तरपत्रिका देण्यात आल्या आहेत.
इयत्ता बारावीच्या परीक्षावेळी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार दुपारनंतर प्रत्येक केंद्रावर बैठक व्यवस्था पाहून खात्री करणेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही गर्दी केली होती.