
इचलकरंजी | शहापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संशयावरुन ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा चोरट्यांकडून पाच मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी युवराज श्रीकांत शिवशरण (वय 26 रा आयको मिलजवळ शिवनाकवाडी) याच्यासह एका अल्पवयीन मुलास अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख रुपये किंमतीच्या 5 मोटरसायली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शहापूर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाकडून शहर व परिसरातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने तपास सुरु असताना पोलिस कॉन्स्टेबल आयुब गडकरी यांना माहिती मिळाली. त्यानुसार तपास करत असताना एका अल्पवयीन मुलाला विनानंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन जाताना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत सदरची मोटरसायकल ही चोरीतील असल्याची माहिती दिली. तर सहकारी युवराज शिवशरण याच्याकडेही चोरीतील 4 मोटरसायकली असल्याची सांगितले. त्यावरुन शिवशरण याला ताब्यात घेऊन चौकशी करत त्याच्याकडील चार मोटरसायकली हस्तगत केल्या. या दोघांकडून शहापूर व शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरलेल्या 1 लाख रुपये किंमतीच्या एकूण 5 मोटरसायकली जप्त केल्या असल्याची माहिती पोलिस निरिक्षक सचिन सुर्यवंशी यांनी दिली.
ही कारवाई पोलिस निरिक्षक सचिन सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश मुंगसे, असिफ कलायगार, रोहित डावाळे, आयुब गडकरी, महेश कोरे, शशिकांत ढोणे, होमागार्ड शेळके, इम्रान मुल्ला यांच्या पथकाने केली.