
इचलकरंजी : शहरातील सम-विषम पार्किंगसह वाहतुक सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शहिद भगतसिंग बागेजवळील नो पार्कींग रद्द करण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवण्याची मागणी इचलकरंजी नागरीक मंचच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधिक्षक समिरसिंह साळवे यांच्याकडे केली आहे. याबाबत सात दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
इचलकरंजी शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत शहर वाहतूक नियंत्रणाबाबतच्या विविध वादग्रस्त मुद्यांबरोबर सम-विषम पार्किंग बंद करण्याबाबतही चर्चा झाली होती. त्यावेळी नागरिकांना नको असेल तर तसा प्रस्ताव पाठवूया आणि शहर वाहतूक आराखड्यात त्यानुसार बदल करण्याचे आश्वासन पोलीस उपअधिक्षकांनी दिले होते. पण, शहर वाहतूक शाखेचे प्रभारी प्रशांत निशाणदार मुद्दाम क्रेनवरून पुकारणे, बँक ऑफ बडोदाजवळ कारवाई करत आहेत. त्यांना पोलीस उपअधिक्षकांच्या आश्वासनाची वेळोवेळी जाणीव करून दिली असता सम-विषम पार्कींग बंद करणे माझ्या अधिकार क्षेत्रात नसल्याचे सांगत आहेत. मात्र सम-विषम पार्कीगच्या कारवाईमुळे मुख्य मार्गावरील व्यावसायिक मेटाकुटीला आले असून वाहनधारकांच्याही तक्रारी वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नागरीक मंचच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधिक्षक साळवे यांची भेट घेतली. यावेळी तातडीने शहरातील सम-विषम पार्कींग तसेच वाहतुक सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार शहिद भगतसिंग बागेजवळील नो पार्कींग रद्द करण्याचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवावेत, याबाबत 7 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
यावेळी साळवे यांनी अप्पर पोलीस अधिक्षकांकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे आश्वास दिले. शिष्टमंडळात अभिजित पटवा, संजय डाके, उदयसिंह निंबाळकर, उमेश पाटील, शितल मगदुम, महेंद्र जाधव, दीपक पंडित, राम आडकी, गोपाल पटेकरी, विद्यासागर चराटे यांचा समावेश होता.