
इचलकरंजी : युवा वर्गातील उदयोजकतेला वाव देण्यासाठी स्टार्ट अप इंडिया या अभियानाची सुरवात करुन सरकारने उद्योगस्नेही वातावरणाची मुहुर्तमेढ रोवली आहे. याअंतर्गत डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमधील ‘टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेटर’ ला वस्त्र मंत्रालय, नॅशनल टेक्नीकल टेक्स्टाईल मिशन (एनटीटीएम) यांचेकडून ५६ लाखाचे अनुदान मंजुर झाले आहे. या अनुदानाच्या मदतीने शेवाळ (अल्गी) अधारित लेपित वस्त्र विकसीत करण्यात येणार आहे जे कृत्रिम लेदरसाठी जैवविघटनशिल व पर्यावरणपूरक पर्याय ठरेल. या स्टार्टअपचा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
हा अभिनव प्रकल्प हिमांशू शेजवलकर यांनी डीकेटीईचे डॉ.एस.बी.व्हनबटटे, सौ. एस.व्ही. चव्हाण आणि डॉ. मंजुनाथ बुर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसीत केला आहे. यामध्ये शेवाळ अधारित लेपित वस्त्र- कृत्रिम लेदरसाठी हरीत पर्याय याची निर्मिती केली आहे सध्या बाजारात प्रचलित कृत्रिम लेदर पीयु (पॉलियुरेथन) आणि पीव्हीसी (पॉलीव्हिनाएल क्लोराईड) पासून बनविले जाते. जे जैव-अविघटनशील असून पर्यावरणासाठी हनिकारक आहे. याउलट हा नविन शेवाळ अधारित लेपित वस्त्र जैवविघटनशील, नुतनिकरण योग्य आणि पर्यावरणपूरक असेल. या कापडाचे फायदे म्हणजे शंभर टक्के जैवविघटनशिल आणि पर्यावरणपूरक यामुळे प्लॅस्टीक कच-याला आळा बसणार, श्वास घेण्यास हलके कृत्रिम लेदरपेक्षा अधिक आरमदायक, जलरोधक आणि लवचिक, अँटी बॅक्टेरिएल आणि युव्ही प्रतिरोधक ज्यामुळे नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म, पेट्रोलिएममुक्त आणि शाश्वत पारंपारिक लेदरऐवजी नुतनीकरण योग्य साहित्याचा वापर यामध्ये असेल.
एनटीटीएम हे भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाने सुरु केलेले अभियान आहे. जे टेक्नीकल टेक्स्टाईलचे संशोधन, विकास आणि बाजारवाढीला चालना देण्याच्या उददेशाने कार्यरत आहे. डीकेटीई मध्ये उपलब्ध असणारा स्टार्ट अप कटटा, तेथील यंत्रसामुग्री व सातत्याने सुरु असलेले संशोधनामुळे टेक्नीकल टेक्स्टाईल वाढीसाठी चालना मिळणार आहे.स्टार्टअपसाठी भारतात चांगली संधी आहे यामध्ये डीकेटीई टीबीआय महत्वाची भुमिका बजावत आहे.
सदर प्रकल्पासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव प्रा.डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व संस्थेचे सर्व विश्वस्त, संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.