
इचलकरंजी | हटकर कोष्टी समाज युवक मंडळ आयोजित कोष्टी समाज टर्फ क्रिकेट लीग ही स्पर्धा नुकतीच हॅप्पी १७ टर्फ, आवाडेनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. विविध नामवंत संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत अंतिम सामना प्लेअर्स ग्रुप विरुद्ध एकलव्य वॉरिअर्स यांच्यात रंगला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत एकलव्य वॉरिअर्स संघाने विजय मिळवून चषकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात प्रभावी कामगिरी करणाऱ्या सौरभ लंगोटे याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस आर्य कस्तुरे यांनी, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस उद्योजक संजय मेटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संपूर्ण स्पर्धेसाठी किटचे प्रायोजक रमेश कबाडे होते. सामनावीर बक्षीस कुणाल सांगले, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांसाठी सीए विनायक विभुते यांनी पुरस्कार दिले, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी प्रभाकर उरणे यांनी बक्षीस दिले. बक्षीस वितरण जिल्हाध्यक्ष इराण्णा सिंहासने, चिंतामणी पारीशवाड, प्रभाकर उरणे, अमृत कबाडे आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये अभय लोले (उत्कृष्ट फलंदाज), सागर लिपारे (उत्कृष्ट गोलंदाज) आणि मंगेश ढवळे (मालिकावीर) यांचा समावेश होता.
स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग घेतला. जयेश बुगड सुपर किंग, यूएफसी रन फॉर युनिटी, एस. एस. सुपर किंग, एकलव्य वॉरिअर्स, जेआरडी वाघीरे वॉरिअर्स, प्लेअर्स ग्रुप, टीम झेनिद, होगडे वॉरिअर्स, डकसन स्पोर्ट्स, आणि झुंजकर ग्रुप हे संघ मैदानात उतरले होते. पंच म्हणून वरद माळी आणि गौतम कट्टीमणी यांनी काम पाहिले.
स्पर्धेसाठी विष्णू सायझर्स, सरस्वती टेक्सटाईल, हाऊस ऑफ आईस्क्रीम, रुकडी बॅग, विजया केटर्स यांच्यासह अनेक उद्योजक आणि संस्था प्रायोजक म्हणून सहभागी झाल्या होत्या.
ही स्पर्धा खेळाडूंसाठी एक मोठं व्यासपीठ ठरली असून, कोष्टी समाजात क्रीडा क्षेत्रातील नवे चेहरे घडवण्यासाठी उपयुक्त ठरली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये अमित खानाज, हेमंत आमणे, विनायक वरुटे, विनय मुसळे, अमर बुचडे, विनायक सोनटक्के, दीपक वस्त्रे, स्वप्नील ढवळे, हर्षद जिरगे व सुमंत आमणे आदींसह अन्य सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.