
इचलकरंजीत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी नवे पदाधिकारी नेमले; सुहास जांभळे शहराध्यक्ष, बाळासाहेब देशमुख प्रदेश उपाध्यक्ष
इचलकरंजी : विनायक कलढोणे
आगामी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण नियुक्त्या केल्या आहेत. विठ्ठलराव चोपडे यांची प्रदेश चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुहास अशोकराव जांभळे यांना इचलकरंजी शहराध्यक्ष तर बाळासाहेब देशमुख यांची सेवादल प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
या निवडी राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
दि. १५ जुलै २०२५ रोजी मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत या निर्णयांची घोषणा झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार अशोकराव जांभळे, विठ्ठलराव चोपडे, बाळासाहेब देशमुख, अमित गाताडे, यासिन मुजावर, निहाल कलावंत आदी उपस्थित होते.
या निवडीनंतर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्य अधिक गतिमान होईल आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भक्कम पायाभरणी होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी व्यक्त केला.