कोल्हापूर | मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बँचला कोल्हापुरात मान्यता मिळाल्यामुळे सहा जिल्ह्यांतील वकिलांचा चार दशकांचा लढा अखेर यशस्वी ठरला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे सामान्य जनतेला न्यायाची सहज उपलब्धता होणार असून, ही संकल्पना खऱ्या अर्थाने ‘न्याय आपल्या दारी’ अशी साकार झाली आहे, असे मत तज्ज्ञ विधिज्ञ ऍड. सचिन यशवंतराव माने यांनी व्यक्त केले.
उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवइ यांच्या पुढाकारामुळे ही मान्यता मिळाल्याचे नमूद करताना ऍड. माने म्हणाले की, “कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील वकिलांनी एकत्रित, संघटित लढा दिला आणि त्यातून सर्किट बँचच्या स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय झाला. ही एक सामाजिक आणि न्यायिक चळवळ होती.”कोल्हापूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता मुंबईपेक्षा हे सहा जिल्ह्यांसाठी अधिक जवळचे ठिकाण आहे. त्यामुळे पक्षकार, वकिल, आणि विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी न्यायालयीन सेवा अधिक सुलभ होणार आहे.
“वर्षानुवर्षं मुंबईला जावे लागणं नवोदित वकिलांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत होते. आता कोल्हापुरातच उच्च न्यायालयाची बँच असल्याने या वकिलांना स्थानिक स्तरावरच मोठ्या खटल्यावर काम करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे नवे वकिल घडतील आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील कायदा क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल,” असे मतही त्यांनी मांडले. या निर्णयामुळे न्याय मिळवण्यासाठी लांबचा प्रवास, वेळ आणि खर्च वाचणार आहे, तसेच सामान्य माणसालाही न्यायालयीन प्रक्रियेचा अधिक विश्वास वाटेल, असेही ऍड. माने यांनी स्पष्ट केले.