
इचलकरंजी | शहरात सध्या विकास कामांचा जोरदार धुमधडाका सुरू असला तरी तो विकासासाठी कमी आणि राजकीय लाभासाठी अधिक असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येत असून, आमदार राहुल आवाडे यांच्या एका उद्घाटन कार्यक्रमाला ते गैरहजर राहिल्याने गोंधळ निर्माण झाला. समर्थकांच्या रोषाचा फटका एका मक्तेदाराला बसला, ज्यामुळे संपूर्ण शहरात हा विषय चर्चेचा ठरला आहे.
महापालिका झाली, पण ‘लुटालूट’ सुरूच!
इचलकरंजी नगरपालिकेचा कारभार पूर्वी “जिओ और जीने दो” अशा पद्धतीने चालत होता, मात्र महापालिकेच्या स्थापनेनंतर तो “लुटो और लुटने दो” या धाटणीने सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. प्रशासक राज आल्यानंतर, महापालिकेतील अधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि त्यांचे समर्थक यांनी विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक मलिदा लाटण्याचा सपाटा लावल्याचे आरोप होत आहेत.
विकास निधीवर वाटपाचा ताबा
तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजनातून 51 कोटींची कामे मंजूर केली होती. त्यामध्ये तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे (भाजप), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी विकास कामे वाटून घेतली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून या कामांचे उद्घाटन धडाक्याने सुरू आहे. यात विशेषतः आमदार राहुल आवाडे यांच्या समर्थकांचा वरचष्मा दिसून येत आहे. आजही अशाच एका समर्थकाने उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला, मात्र आमदारांनीच त्यावर पाठ फिरवल्याने मोठी चर्चा रंगली आहे.
मक्तेदारांकडे दादागिरी, कार्यकर्त्यांचे फावले!
महापालिकेतील घोटाळ्यांची मालिका एवढी वाढली आहे की, मक्तेदारांना कमी बजेटमध्ये कामे करता येत नाहीत आणि अधिक निधी मंजूर करायचा असेल तर कार्यकर्त्यांना ‘हिस्सा’ द्यावा लागतो. त्यामुळे अनेक मक्तेदार आता कामांपासून दूर राहत आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार आवाडे यांच्या एका समर्थकाने आयोजित केलेल्या उद्घाटन कार्यक्रमावर आमदारांनी पाठ फिरवली आणि समर्थकांचा रोष मक्तेदारावर निघाला.
मक्तेदारांचा एकजुटीचा इशारा!
आजच्या घटनेनंतर मक्तेदार आता संघटीत होत असून, आपल्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची तयारी करत आहेत. जर महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मक्तेदारांवरील अन्याय थांबवला नाही, तर विकास कामे ठप्प करण्याचा इशाराही दिला जात आहे.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर
महायुतीतील श्रेयवादाची लढाई दिवसेंदिवस वाढत असून, भाजप आमदार असूनही त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्घाटन सोहळ्यात स्थान दिले जात नसल्याची तक्रार वाढली आहे. महाविकास आघाडीच्या काही समर्थकांकडून सर्व श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यामुळे महायुतीतीलच अंतर्गत संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
विकास की नुसता तमाशा?
इचलकरंजीतील महापालिका व्यवस्थापन, राजकीय संघर्ष आणि विकास निधीच्या गैरवाटपाने शहराचा विकास खुंटत असून, सामान्य नागरिकांच्या मनात मात्र एकच प्रश्न आहे. शहराचा खरा विकास कधी होणार, की हा नुसता श्रेयवादाचा खेळ सुरूच राहणार?
– विनायक कलढोणे