आमदार राहुल आवाडे यांचा पाठपुरावा

इचलकरंजी | स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठीचा पहिला हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या हिस्स्याची 31 लाख 20 हजाराची रक्कम महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे. स्वच्छ व सुंदर इचलकरंजी अंतर्गत या कामी आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला होता.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेने शहर स्वच्छता आराखडा तयार केला असून त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने लाभार्थ्यांची निवड करुन त्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधीचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. एकूण 520 लाभार्थी असून त्यांना शौचालय बांधणीसाठी प्रत्येकी 12 हजार रुपयांप्रमाणे 62 लाख 40 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा 20 लाख 80 हजार आणि राज्य शासनाचा हिस्सा 41 लाख 60 हजार इतका असणार आहे. त्यानुसार 31 लाख 20 हजार रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून त्यामध्ये केंद्राचा हिस्सा 10 लाख 40 हजार तर राज्याचा हिस्सा 20 लाख 80 हजार इतका आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक लाभार्थ्याला 6 हजार रुपये मिळणार आहेत. तर शौचालय पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत 6 हजार रुपये दिले जातील.
इचलकरंजी शहर स्वच्छ व सुंदर व्हावे या दृष्टीने घर तेथे शौचालय या उपक्रमातंर्गत आमदार आवाडे यांनी शौचालय बांधणीसाठी तातडीने अनुदान मिळण्याबाबत शासनाने पाठपुरावा सुरु केला होता. त्याला यश मिळाले असून पहिला महानगरपालिकेला हप्ता प्राप्त झाला आहे. लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, तसेच ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांनीही शौचालय बांधणीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन आमदार आवाडे यांनी केले आहे.