
इचलकरंजी : शहरातील मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान महिन्याची सुरुवात उत्साहात केली आहे. रविवार, २ मार्चपासून रोजे (उपवास) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पहाटे पहिल्या सहरीसह धार्मिक वातावरणात रमजानचे स्वागत करण्यात आले.
रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना मानला जातो. धार्मिक ग्रंथ कुराण शरीफ याच महिन्यात अवतरला अशी धारणा आहे. त्यामुळे संपूर्ण महिन्यात उपवास, नमाज, कुराण पठण आणि दानधर्माला विशेष महत्त्व दिले जाते. सूर्योदयापूर्वी ‘सहरी’ घेतल्यानंतर मुस्लिम बांधव दिवसभर अन्न व पाणीग्रहण न करता उपवास करतात. संध्याकाळी इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडला जातो.
शहरातील मशिदींमध्ये नमाज पठणासाठी भाविकांची गर्दी होत आहे. तसेच रमजानच्या निमित्ताने धार्मिक व सामाजिक कार्याला चालना मिळत असून दानधर्म, गरीब व गरजूंसाठी मदतीचे हात पुढे सरसावले जात आहेत.
रमजान महिन्याच्या निमित्ताने शांतता, सौहार्द आणि आत्मशुद्धीचा संदेश देण्यात येत असून, शहरभरात धार्मिक उत्साहाचे वातावरण आहे.