
इचलकरंजी : इचलकरंजी आणि परिसरातील हजारो कामगारांसाठी ईएसआयसीचे स्वतंत्र आयसीयू असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करावे, या मागणीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले. योगी बाळ महाराज यांच्या नेतृत्वाखाली विविध औद्योगिक असोसिएशनच्या प्रतिनिधींनी ही मागणी लावून धरली.
इचलकरंजी, लक्ष्मी औद्योगिक वसाहत तसेच हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील ४५,००० कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईएसआयसी सुविधा मिळते. यासाठी कंपन्यांचे मालक आणि कामगार दरमहा कोट्यवधी रुपयांचा हप्ता भरतात. मात्र, अद्याप चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे इचलकरंजी येथे अत्याधुनिक सुविधा असलेले ईएसआयसी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि कार्यालय एकाच इमारतीत असावे, अशी मागणी करण्यात आली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या मागणीची दखल घेत पुढील १५ दिवसांत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी स्लिमा अध्यक्ष महेश दाते, संचालक श्यामसुंदर मर्दा, अजित केटकाळे, शिवाजी केसरे, इचलकरंजी इंजिनीअरिंग असोसिएशनचे काशिनाथ जगदाळे, सायझिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष पांडुरंग धोनपुडे, सेक्रेटरी दिलीप ढोकळे, संचालक बंडोपंत लाड, हर्षद पटनावर, अनिल मगदूम, मुकेश वडेरा, प्रमोद घोटणे, अजय मनवाडे, वसंत आपटे तसेच कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.